अल्पसंख्यांक सेलचे राष्ट्रीय सरचिटणीस सलीम सारंग यांचा दावा
मुंबई: प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सर्वसमावेशक भूमिकेच्या पाठीशी संपूर्ण महाराष्ट्रातील अल्पसंख्यांक समाज ठामपणे उभा असून त्यांच्या पाठिंब्यामुळे लोकसभा निवडणुकीत महायुतीचे अधिकाधिक उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष सलीम सारंग यांनी केला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या कालावधीत सलीम सारंग हे संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करीत असून महायुतीच्या दृष्टीने वातावरण अनुकूल असल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदविले आहे. केंद्रात नरेंद्र मोदी आणि राज्यात अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली अल्पसंख्यांक समाजाला सुरक्षित आणि सुसंस्कृत वातावरणातून समृद्धीकडे वाटचाल करता येईल, असा विश्वास सारंग यांनी व्यक्त केला.
सारंग हे केवळ राजकीय दृष्टिकोनातूनच नव्हे तर विशेषतः मुस्लिम समाजाची सर्वांगीण प्रगती व्हावी यासाठी सामाजिक क्षेत्रातही सातत्याने कार्यरत आहेत. मोठ्या प्रमाणावर आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या मुस्लिम समाजाला सशक्त करण्यासाठी या समाजात शिक्षणाचा प्रसार झाला पाहिजे, अशी त्यांची ठाम भूमिका आहे.
गरीब मुस्लिम समाजात शिक्षणाचा प्रसार व्हावा यासाठी मुस्लिम समाजाला शैक्षणिक आरक्षण मिळावे, ही त्यांची आग्रही मागणी आहे. या मागणीसाठी मागील अनेक वर्षापासून सारंग हे सर्व पातळ्यांवर सातत्याने प्रयत्न करीत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे, ‘सब का साथ, सब का विकास,’ हे धोरण आणि महाराष्ट्राचे विकासपुरुष उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सर्वसमावेशक भूमिका यामुळे मुस्लिम समाजाची शैक्षणिक आरक्षणाची मागणी लवकरच मान्य होईल, असा त्यांना विश्वास आहे.
केवळ अल्पसंख्यांक नव्हे तर तळागाळातील सर्व समाजघटकांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी संपूर्ण राज्यभरात वीस जनसंपर्क कार्यालये सुरू करणे, राज्यभर छोट्या मोठ्या उद्योगात काम करणाऱ्या किमान दोन कोटी कामगारांची संघटित शक्ती उभी करणे, अल्पसंख्य समाजाच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी किमान एक लाख सदस्यांचा दबाव गट निर्माण करणे, अशी सलीम सारंग यांची उद्दिष्ट आहेत.