मुंबई: प्रतिनिधी
पक्षात आमच्याकडेच बहुमत आहे. त्यामुळेच निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह आम्हाला दिले आहे. ठाकरे गट हाच घटनाबाह्य आहे. आजही आमचा व्हीप त्यांच्यावर लागू आहे, असा दावा करतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, आज विधानसभा अध्यक्षांकडून येणारा निकाल निखळ गुणवत्तेच्या आधारावर असेल, असा विश्वास व्यक्त केला.
शिवसेनेतील आमदार अपात्रतेच्या दाव्यांवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा निकाल येण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. अध्यक्षांकडून निकाल आल्यानंतर त्यावर अधिकृत प्रतिक्रिया दिली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पक्षातील बहुसंख्य लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते आमच्या पाठीशी आहेत. विधानसभेत आमचे ६७ टक्के तर लोकसभेत ७५ टक्के बहुमत आहे. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊनच निवडणूक आयोगाने पक्षाचे नाव आणि चिन्ह आम्हाला प्रदान केले आहे. अधिकृत शिवसेना म्हणून मान्यता दिली आहे, असे शिंदे म्हणाले.
आजचा निकाल म्हणजे मॅच फिक्सिंग असेल, या आरोपावरही शिंदे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे त्यांच्या शासकीय वाहनातून दिवसा उजेडी मला भेटण्यासाठी आले. त्यांच्या मतदारसंघात सुरू असलेल्या कोस्टल रोडच्या कामासंबंधीची ही भेट होती. ही भेट मॅचफिक्सिंगसाठी असली तर नार्वेकर हे लपून-छपून आले असते, असा दावा शिंदे यांनी केला. मॅच फिक्सिंगचा आरोप करणाऱ्या लोकांपैकीच काही लोक अध्यक्षांच्या दालनात जेवायला बसत होते त्याला आम्ही आक्षेप घेतला का, असा सवालही त्यांनी केला.