नवी दिल्ली: प्रतिनिधी
तरुणांनी अधिक उत्साहाने आणि संख्येने राजकारणात यावी यासाठी निवडणूक लढविण्याची वयोमर्यादा कमी करून ती १८ वर्षांवर आणण्यात यावी, अशी शिफारस संसदीय समितीने केली आहे. कोणताही युवक किंवा युवती 18 वर्षानंतर मतदानाला पात्र आहे तर त्यांना निवडणुकीला उभे राहण्याचाही हक्क आहे, असे मत समितीने मांडले आहे.
सध्या भारतात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लढवण्यासाठी वयाची २५ वर्षे पूर्ण असावी आणि विधानपरिषद व राज्यसभेवर निवडून जाण्यासाठी वयाची ३० वर्षे पूर्ण असावी, अशी अट आहे. मात्र युवकांनी अधिकाधिक प्रमाणात राजकारणात यावेळी यासाठी निवडणूक लढविण्याची किमान वयोमर्यादा कमी करण्याची शिफारस संसदीय समितीने केली आहे.
ही शिफारस करताना समितीने काही युरोपियन देशांचा दाखला दिला आहे. कॅनडा, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये तरुणांना निवडणूक लढविण्याची संधी दिली जाते. या तरुणांमधून जबाबदार आणि विश्वासार्ह नेतृत्व घडत असल्याचे दिसून आले आहे. त्याचप्रमाणे या देशातील युवक अठराव्या वर्षानंतर मतदानाची जबाबदारी स्वीकारू शकत असतील तर त्यांना लोकप्रतिनिधित्वाची जबाबदारी देण्यास हरकत नाही, असेही समितीने म्हटले आहे.