मुंबई: प्रतिनिधी
अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मधील समर्थक आमदारांना बरोबर घेऊन उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांचे निकटवर्तीय समजले जाणारे आमदार अमोल मिटकरी यांनी, अजित पवार लवकरच मुख्यमंत्री होतील, असे विधान केले आहे. या विधानामुळे शिवसेना शिंदे गटातील आमदारांमध्ये संतापाची भावना आहे. मात्र, राष्ट्रवादी सत्तेत सहभागी झाल्यामुळे कोणीही नाराज नाही, अशी ग्वाही अजित पवार यांनीच दिली आहे.
विकासाच्या मुद्द्यावरच आपण सत्तेत सहभागी झालो असून देशाच्या पातळीचा विचार केल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एवढा मोठा नेता कोणीच नाही. त्यांच्या नेतृत्वाखाली देश विकासाकडे वाटचाल करीत आहे, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले. सत्तेत आणखी एखादा पक्ष सहभागी झाल्यामुळे पदांच्या वाटपावरून काही चर्चा किंवा मतभेद होणे स्वाभाविक आहे. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याबाबत योग्य निर्णय घेतील, असेही ते म्हणाले.
सन 2024 ची निवडणूक आपण महायुती म्हणून लढणार आहोत. या निवडणुकीपर्यंत एकनाथ शिंदे हेच राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर कायम राहतील आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवली जाईल, अशी ग्वाही खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. त्यामुळे एखाद्या आमदार महोदयांनी केलेल्या विधानावर फार विचार करण्याची आवश्यकता नाही, असे मत शिवसेना शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केले.