
सातारा: प्रतिनिधी
एकीकडे पत्रकार परिषदेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी, अजित पवार आमचे नेते आहेत, या खासदार सुप्रिया सुळे यांच्या विधानाचे समर्थन केले असतानाच दुसरीकडे अजित पवार यांना यापुढे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संधी नाही, अशी भूमिका मांडली आहे. संधी वारंवार मागायची नसते आणि ती द्यायचीही नसते, अशा शब्दात पवार यांनी अजित पवार यांच्या बाबतची भूमिका स्पष्ट केली.
महाराष्ट्राच्या राजकारणात यापूर्वी पहाटेच्या वेळी दोघांचा शपथविधी झाला होता. त्यामध्ये आमचे एक सहकारी सहभागी झाले होते. मात्र, एखाद्याने एक दोन वेळा वेगळा मार्ग पत्करला आणि त्यानंतर तो दुरुस्त केला तर सुधारण्याची संधी देता येते. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसने असाच विचार करून पहाटेच्या शपथविधीत सहभागी झालेल्यांना सामावून घेतले होते. मात्र, त्याच त्याच चुका वारंवार करणाऱ्यांना पुन्हा पुन्हा संधी दिली जाऊ शकत नाही, असेही पवार म्हणाले.
आज सकाळीच पत्रकार परिषदेत बोलताना पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडलेलीच नाही, असा दावा केला होता. पक्षातील काही लोकांनी वेगळा विचार करून वेगळा मार्ग पत्करला तर तो लोकशाही व्यवस्थेने दिलेला अधिकार आहे, असे सांगतानाच पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्या अजित पवार यांच्या बाबतच्या भूमिकेचे समर्थनही केले होते. मात्र, दहिवडी येथे बोलताना पवार यांनी अजित पवार यांच्याबाबत पक्षाची भूमिका कठोर असल्याचे स्पष्ट केले.