कीव विमानतळावर कब्जा करण्याचा प्रयत्न
युद्धाला रशिया जबाबदार असल्याचा बायडेन यांचा दावा
मॉस्को: रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी अखेर युक्रेनविरुद्ध युद्धाची घोषणा केली आहे. अमेरिका आणि युरोपमधील देशांच्या इशाऱ्यांना न जुमानता त्यांनी युक्रेनमध्ये लष्करी कारवाई सुरू केली आहे. युक्रेनच्या सैन्याने शस्त्र खाली ठेऊन मायदेशी परतण्याचे आवाहन रशियाने केले आहे. इतर कोणताही देश मध्ये पडल्यास त्यांच्यावरही लष्करी कारवाई केली जाईल, असेही पुतीन यांनी धमकावले आहे. राजधानी कीवसह युक्रेनच्या अनेक भागात स्फोटांचे धमाके बघायला मिळाले आहेत. कीव विमानतळावर कब्जा करण्याचा प्रयत्न रशियन सैन्याकडून झाल्याचेही वृत्त आहे. या युद्धाला आणि त्यामध्ये होणाऱ्या संहाराला रशिया जबाबदार असेल, असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी दिला आहे.
… तर अत्यंत वाईट परिणाम भोगावे लागतील: पुतीन
पुतीन यांनी पाश्चिमात्य देश आणि ‘नाटो’लाही धमकावले आहे. रशिया- युक्रेन संघर्षांत इतर कोणीही ढवळाढवळ करू नये . ता [प्रयत्न झाल्यास रशियाकडून चोख प्रत्युत्तर देण्यात येईल आणि इतिहासात कधीही अनुभवाला आलेले नाहीत इतक्या वाईट परिणामांना सामोरे जावे लागेल. युक्रेनचे काय करायचे याबाबतचे निर्णय आपण घेतले असून त्याचे परिणाम काय होतील याची आपण फिकीर करत नाही, असेही पुतिन म्हणाले.
बायडेन यांनी युद्ध आणि प्राणहानीची जबाबदारी रशियावर असेल; याची जाणीव करून दिली आहे. ‘व्हाईट हाऊस’ परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. शुक्रवारी बायडेन जी-७ देशांच्या नेत्यांशी चर्चा करणार आहेत. पुतीन यांनी अमेरिकेला हस्तक्षेप न करण्याची धमकीही दिली आहे. रशियासाठी हा जीवन-मरणाचा संघर्ष आहे. आम्ही पूर्ण तयारीने युद्धभूमीवर उतरलो आहोत, असे पुतीन यांनी नमूद केले.
पुतिन यांच्या युद्धघोषणेनंतर त्वरित युक्रेन आणि राजधानी कीवमधील बंडखोरांच्या ताब्यातील भूभागात मोठे स्फोट झाल्याचे आढळून आले. रशियाच्या टेलिव्हिजन नेटवर्क ‘आरटी’च्या वृत्तानुसार युक्रेनमध्ये साराच भागात स्फोट झाले आहेत. डॉनबास प्रांतात लष्करी कारवाया सुरू आहेत.
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत या संघर्षाबाबत विचारविमर्श केला जात आहे. युक्रेन आणि त्यांचे पाश्चात्य मित्र देश नेमकी काय भूमिका घेतात हे पाहावे लागेल. जर अमेरिकेच्या नेतृत्वाखालील नाटो सैन्य युद्धात उतरले तर युरोपच्या भूमीवर एक मोठे युद्ध सुरू होऊ शकते, अशी भीती युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी रशियन जनतेला दिलेल्या संदेशात व्यक्त केली आहे.
‘जगाने पुतिन यांना थांबवावे’
युक्रेनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी संयुक्त राष्ट्रांना उद्देशून आवाहन केले आहे की, आपला देश स्वतःचा बचाव करण्यात यशस्वी ठरेल. पुतिन यांनी नुकतेच युक्रेनवर संपूर्ण आक्रमण सुरू केले आहे. युक्रेनच्या शांत शहरांवर हल्ले होत आहेत. या आक्रमकतेला पायबंद घालणे आवश्यक आहे. जग पुतीनला थांबवू शकते आणि तसे थांबविणे आवश्यक आहे. आता पुतीन यांच्या दांडगाईविरोधात कारवाई करण्याची वेळ आली आहे, असेही ते म्हणाले.