Home Politics अखेर छत्रपती उदयनमहाराज यांची उमेदवारी जाहीर

अखेर छत्रपती उदयनमहाराज यांची उमेदवारी जाहीर

अखेर छत्रपती उदयनमहाराज यांची उमेदवारी जाहीर

सातारा: प्रतिनिधी

सातारा लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाकडून महायुतीचे उमेदवार म्हणून छत्रपती उदयन महाराज भोसले यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शशिकांत शिंदे आणि उदयनराजे यांची थेट लढत बघायला मिळणार आहे.

महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही प्रतिस्पर्ध्यांकडून सातारा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार जाहीर करण्यास विलंब झाल्यामुळे याबद्दलची उत्सुकता राजकीय वर्तुळात ताणली गेली होती. उदयनराजे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मतदारसंघातील चित्र स्पष्ट झाले आहे.

शरद पवार यांचे विश्वासू मित्र आणि या मतदारसंघातील खासदार श्रीनिवास पाटील यांनाच या मतदारसंघातून महाविकास आघाडीची उमेदवारी दिली जाणार, हे गृहीत धरले जात होते. मात्र, ऐनवेळी प्रकृती अस्वस्थ्याचे कारण देऊन पाटील यांनी ही निवडणूक लढविण्यास असमर्थता दर्शवली. त्यामुळे या मतदारसंघातून उमेदवारी कोणाला द्यायची असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासमोर पडला. अखेर शरद पवार यांचे विश्वासू शशिकांत शिंदे यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली.

दुसरीकडे प्रतिस्पर्धी उमेदवाराची प्रतीक्षा आणि नरेंद्र पाटील यांच्यासह अनेकांची या मतदारसंघातील दावेदारी यामुळे भाजपलाही या मतदारसंघातील उमेदवारी जाहीर करण्यास उशीर झाला. उदयनराजे हे राज्यसभेचे विद्यमान खासदार असून त्यांची दोन वर्ष बाकी आहेत, हा एक मुद्दाही उदयनराजे यांची उमेदवारी जाहीर करण्यास विलंबाचे कारण ठरला. अखेर त्यांच्याच नावावर शिक्कामोर्तब झाल्याने या मतदारसंघात महायुती व महाआघाडी यांच्या थेट लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.