मुंबई : प्रतिनिधी
अखेर रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात तिढा सुटला असून शिवसेना शिंदे गटाचे किरण सामंत यांनी माघार घेतली असून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
कोकणातील हा महत्वाचा मतदारसंघ महायुतीमध्ये दीर्घ काळ वादाचे कारण ठरला होता. शिवसेना शिंदे गट आणि भारतीय जनता पक्ष या दोघांचाही या मतदारसंघावर दावा होता. शिवसेनेकडून राज्यातील ज्येष्ठ मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत या मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक होते तर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी या मतदारसंघात रिंगणात उतरावे, अशी भाजपची इच्छा होती.
भाजप शिवसेना युती असताना हा मतदारसंघ दीर्घकाळ शिवसेनेकडे होता. शिवसेनेचे विनायक राऊत यांनी दोन वेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यामुळे शिवसेना फुटल्यानंतरही हा मतदारसंघ आपल्याकडे राहावा असा शिंदे गटाचा आग्रह होता. त्यांनी किरण सामंत यांची उमेदवारीही निश्चित केली होती. मात्र, शिवसेना फुटल्यानंतर राजकीय समीकरणे बदलल्याचा दावा करून भाजपने या मतदारसंघासाठी आग्रह धरला होता. शिवाय राज्यसभेतून निवृत्त झालेल्या किंवा कमी कालावधी उरलेल्या खासदारांना लोकसभेच्या रिंगणात उतरविण्याचे धोरण अमलात आणण्याचे धोरण भाजपाने अंगीकारले आहे. त्यानुसार ही जागा नारायण राणे यांनी लढवावी, अशी भाजपची इच्छा आहे. नारायण राणे यांनी उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच मतदारसंघात आपला प्रचारही सुरू केला आहे.
अखेर महायुतीमध्ये भाजपच्या आग्रहाला मान देऊन शिंदे गटाने माघार घेतली आहे या मतदारसंघातून शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे विद्यमान खासदार विनायक राऊत आणि भाजपाचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यात लढत होणार हे निश्चित झाले आहे.