दाऊदच्या बहिणीच्या घरीही धाड
मुंबई: आर्थिक घोटाळा प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) महानगरातील अंडरवर्ल्डशी संबंधित लोकांच्या घरांवर छापे टाकले आहेत. वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार ईडीने दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकर हिच्या निवासस्थानावरही छापा टाकला आहे. याशिवाय, त्याशिवाय दाऊदच्या गुन्हेगारी वर्तुळातील अनेक नामचीन गुंडांच्या घरांवर छापेसत्र सुरू केले आहे. मालमत्ता आणि बेनामी मालमत्ता प्रकरणी ही कारवाई सुरू आहे.
सक्तवसुली संचालनालयाच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार शहरात एकूण दहा ठिकाणी छापे टाकण्यात आले असून ‘मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्या’ अंतर्गत ही कारवाई केली जात आहे. ईडीची कारवाई राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) दाखल केलेल्या गुन्ह्याच्या आणि गुप्तचर यंत्रणांच्या माहितीवर आधारित आहे. एका बड्या राजकारण्याच्या मालमत्ताही रडारवर असल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले.
बड्या राजकारण्याचा उल्लेख ईडीने केल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मात्र, अधिकाऱ्यांनी या नेत्याचे नाव उघड केलेले नाही. ईडीचे अधिकारी केवळ तपास सुरू झाल्याचे सांगत आहेत.