शिर्डीः राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शिर्डी येथे मंथन शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे. शरद पवार यांनी आजारी असतांनासुद्धा या शिबिराला हजेरी लावली. पवार फक्त चारच मिनिटं बोलले. त्यांचं उर्वरित भाषण दिलीप वळसे पाटील यांनी वाचून दाखवलं.
यावेळी बोलतांना शरद पवार म्हणाले की, उपचारानंतर दहा ते पंधरा दिवसांमध्ये मी पुन्हा नियमित कामाला लागणार आहे. सध्या तब्येत ठीक नाही. त्यामुळे जास्त बोलू शकत नाही, असं पवार म्हणाले. यावेळी त्यांचा आवाज खोल गेल्याचं जाणवलं.
यानंतर दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवार यांचं भाषण वाचून दाखवलं. यामध्ये शरद पवार यांच्या सुरुवातीच्या काळापासूनच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला.
शरद पवार आज शिर्डीला कार्यकर्ता शिबिरासाठी हेलिकॉप्टरने रवाना झाले. यावेळी त्यांच्यासोबत डॉक्टरांची एक टीमही होती. ही डॉक्टरांची टीम त्यांच्या आरोग्यावर लक्ष ठेवून राहतील.शरद पवार यांच्यासोबत डॉक्टर प्रतीक समदानी आणि त्यांचे काही सहकारी आहेत. शिर्डीहून परतल्यावर त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल केलं जाणार आहे.